Wednesday, April 27, 2016



परवापासून बेदाणेयुक्त लाडवांच्या पाककृती धुमाकूळ घालत आहेत. त्याच धर्तीवर आम्ही देखील हात धुवून घ्यायचे ठरवले आहे.
सादर आहेत राजकीय लाडवांच्या पाककृती. लाडू पचायला हलके आहेत तरी कुणीही अपचनाचा त्रास करून घेऊ नये.


भाजप लाडू: लाडू वळताना नागपूरकडे तोंड करून बसावे. उपलब्ध सामानात किती लाडू होतील ह्याचा वेगवेगळ्या संस्था, स्वयंसेवक इत्यादींकडून सर्वे करुन घ्यावा. गुजरातेतून 'शाही' तुकडा मागवावा. आजूबाजूच्या मित्र पक्षांना लाडू वळवायला बोलवावे. लाडू बेसनाचे असले तरी त्याला मोदीचुर लाडू असे नाव देऊन, तयार माल ऑनलाइन वाटावा.
कम्युनिस्ट लाडू: आम्हीच लाडू बनवतो. बनवणार. बनवणारच. बनवूच. अश्या घोषणा काही दशके द्याव्यात. लाडू वळणारे हात कमी झाले की बाजुच्या गोटात जाऊन दोनचार कोथळे काढून यावेत. नंतर पूर्ण आवेशात (मुठी) वळून घोषणा द्याव्यात. सामान शिल्लक असल्यास कॉलेजच्या पोरांकडून लाडवांचे पीठ तयार करून घ्यावे. नंतर एखाद्या आंदोलनात तेच पीठ रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करावा.
शिवसेना लाडू: शंभर लाडवांच्या सामानात पावणेदोनशे लाडू बनवून दाखवू अशी घोषणा करावी. साहित्य: मुंबई महापालिका 1 किलो, ठाणे महापालिका अर्धा किलो, ग्रामपंचायती चमचा भर, जिल्हा परिषदा वाटीभर, भीमशक्ती चवीनुसार. एखाद्या लाडवाला गोल आकार आला नाही तर त्याला कमळाबाई म्हणून हिणवावे. आता तयार झालेले लाडू शिवलाडू ह्या नावाने विकावेत.
(महा)राष्ट्रवादी लाडू: नाशिक मधून द्राक्षे आणून आर्थर रोडला वाळत टाकावीत. बेसन, साजूक तूप, डालडा, आणि आपल्याच कारखान्यातली साखर घ्यावी. साजूक आणि डालडा अशी दोन व्हर्जन्स विरोधी पक्षाकडून बनवून घ्यावीत. सत्ता गेली की त्या लाडवांची वरात दिल्लीत काढून आणावी. वरात काढतांना हा शिरकुर्मा आहे हे सांगावे. एव्हाना द्राक्षांचे बेदाणे झाले असतील. लाडवांवर बेदाणे लावून पुतण्या आणि मुलीला समप्रमाणात वाटावेत. (कोणाचा लाडू डालडाचा आणि कोणाचा साजूक तुपातला हे उघड करू नये).
मनसे लाडू: आमचेच लाडू पौष्टिक अशी जाहिरात करावी. ग्राहकांनी लाडू मागितल्यास दुकानात सामान आणायला जावे आणि थेट शिवाजी पार्कात सभेत प्रकट व्हावे. आम्हाला भाव द्या मग बघा कसे लाडू बनवतो असे आवाहन वजा आव्हान उपस्थितांना द्यावे. जाहिरातीत मधेच चिकन सूप वगैरे घुसवावे. लाडू कडक बनवावेत जेणे करून खातांना खळखटयाक असा आवाज येईल.
काँग्रेस लाडू: ह्या लाडूची रेसिपी खानदानी आहे. काही ठराविक 'हातच' हा लाडू बनवू शकतात. पर्याय नसल्यास तोंड न उघडणाऱ्याला लाडू बनवायला बसवावे म्हणजे तो खाणार नाही. लाडू बनवताना गरिबांचे लाडू अशी जाहिरात करावी आणि गर्दी झाल्यास आणीबाणी जाहीर करावी. लाडूला लावायचा सुकामेवा स्वतःच्या घरी सुरक्षित ठेवावा.
तिसरी आघाडी लाडू: आपण तिसऱ्या आघाडीत आहोत अशी सामूहिक कल्पना करावी. आपल्या समोर मुबलक सामान पडले आहे असे समजून 2002 लाडवांचा संकल्प सोडावा. कल्पनाविलासात्मक उपद्व्यापा नंतर आपल्याकडे 2019 लाडू तयार आहेत अशी समजूत घालून घ्यावी. त्याचे समान वाटप करताना जोरदार भांडण करावे आणि शेवटी आपापल्या घरी जावे.
मतदार लाडू: लाडवांचे पीठ (असल्यास) घ्यावे. साखर (असल्यास) घ्यावी. तूप (असल्यास) घ्यावे. लाडू बनवावेत. काहीच नाहीतर पाणी (असल्यास) पिऊन झोपून जावे.
-चिराग पत्की

No comments:

Post a Comment