Friday, January 10, 2014

माझा लोकलानुभव

स्थळ: ठाणे स्टेशन. सकाळी ८:०३ ची पनवेल लोकल.
 
सोमालियाच्या पायरेट्सनाही लाजवेल अश्या पद्धतीने मी सहप्रवाश्यांशी लढा देऊन विंडोसीट पटकावली. मनातल्या मनात ह्या अचिव्हमेंटसाठी गडगडाटी हास्य करत असतांनाच शेजारी आणि समोर ठिकठिकाणी गंध लावलेले काही इसम येउन बसले. लोकल सुटायला काही मिनीटे असतांना सदर व्यक्तींनी आपापल्या बॅगेतून झांजा वगैरे आयुधे काढायला सुरवात केली. पुढे काय वाढून ठेवले आहे ह्याचा अंदाज येत असतांनाच 

एक वीशीतला तरूण मृदूंग घेउन लोकल मध्ये चढला. वाटेतील सहप्रवाश्यांच्या पोटांना मृदूंगाच्या धडका देत आमच्या सीटकडे कूच करू लागला. समोरची सीट अगोदरच भरली असल्याने २ मिनीटांच्या परिसंवादानंतर त्यांच्या पैकी एकाने खिडकीसमोर उभे राहून माझ्या विंडोविजयावर पाणी ओतले. बाजूला, समोर आणि पायापाशी जागा पकडून भजनीबुवांनी मला घेरले आणि मला कात्रजच्या घाटात अडकल्याची जाणीव झाली. लोकल सुरू होताच एकाने मृदूंगावर थाप देऊन नांदी केली. "विठ्ठल तुझे नाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽव किती गोऽऽड" ने लोकलचा ठेका पकडला. जन्माष्टमीचा माहोल असल्याने विठ्ठलाला तिसर्‍याच स्टेशनवर निरोप देण्यात आला. भजनासुरांचा हल्ला सहन न झाल्यामुळे मी कानात रॉकस्टार वगैरे भरून घ्यायचा प्रयत्न केला परंतु सर्व संगीतकारांनी ह्या महानुभावांपुढे हात टेकले. दोन ज्येष्ठ नागरिक, बुवांनी घेतलेल्या ताना मान डोलावून ’लाईक’ करत होते. काही माझ्यासारखे त्रस्त एकमेकांकडे समदुःखी कटाक्ष टाकत होते. एव्हाना भजनाचा टेम्पो ओव्हरहेड वायरला स्पर्श करू लागला होता. माझ्या शेजारच्या एकाने झांज वाजवायची थांबवली आणि मोबाईल काढून एका ललनेच्या मेसेजला प्रत्युत्तर देऊ लागला. लगेच मंडळातल्याच एका मामांनी त्याला नजरेने दर्डावले. (योगायोगाने मामांच्या हातात ’लोकमत’चे भेंडोळे होते.)
आता अर्धातास उलटून गेला होता. मंडळींची लगबग सुरू झाली. ईप्सित स्टेशन येणार असे जाणवताच सर्वांनी जणू काही रिव्हायटलची गोळी तोंडात टाकली. एका अतिउत्साही बुवाने लोकलचा पत्रादेखील बडवायला सुरवात केली. "कान्ह्याचा रंग कस्सा रंग कस्सा सावळाऽऽ...ओहो सावळाऽऽऽ" ने लोकल निनादू लागली. भजनीबुवांप्रमाणेच वातावरणही तापलं. लिरिक्स कळेनासे झाले. माना जोरजोरात हलू लागल्या. हे परमोच्च क्षण काही काळ टिकले. मग एक एक करत पतंगा प्रमाणे सगळे बुवा जमीनीवर आले. आपापल्या बॅगेत आयुधे म्यान केली आणि जन्माष्टमीचा प्रसाद म्हणून सर्वांना (माझ्या झोपेचे) खोबरे वाटले. सर्वांनी प्रसाद भक्तीभावाने ग्रहण केला आहे ह्याची खात्री करून मंडळी सी.बी.डी.ला उतरली. आता मस्त पैकी पाय पसरून बसणार इतक्यात तिवारी, पांडे, यादव किंवा तत्सम आडनाव असलेला मनुष्य समोर येऊन बसला आणि त्याने त्याचा मोबाईल खिश्यातून काढला. पुढे काय झाले हे पाहायला मी तिथे थांबलो नाही.

No comments:

Post a Comment