Thursday, January 9, 2014

हितोपदेशाचे न्यूजफीड: भाग १

फार वर्षांपूर्वी मगध देशात एक हातोबुद्ध नावाचा राजा राज्य करत होता. नावाप्रमाणेच तो हतबुद्ध होता आणि त्यास प्रजेला हातोहात फसवायची कला देखील अवगत होती. त्याच्या सिंहासनामागे एक मोठे सिंहासन लपवून ठेवले आहे अशी प्रजेत चर्चा होत असे. परंतु हातोबुद्ध ह्या चर्चेला नेहमीच अनावश्यक समजत असे. हातोबुद्ध पूर्वी नरकेसरी नावाच्या राजाचा सल्लागार होता. परंतु देशातील गांधझोल नावाच्या सर्वोच्च घराण्याच्या वरदहस्तामुळे हातोबुद्धाला सिंहासनावर आरूढ होण्याची संधी मिळाली. हातोबुद्धाला राज्यकारभार मिळून सुमारे दहा वर्षे होत आली होती. परंतु प्रजेमध्ये हातोबुद्धाविषयी कमालीचा क्रोध होता. देशात काही मासांच्या अवधीवर निवडणूका आल्या होत्या. हातोबुद्धाने निवृत्ती जाहिर केली होती, आणि आपल्या जागी मंदहूल ह्या गांधझोल घराण्याच्या वारसाची नियुक्ती करावी असा मनोदय व्यक्त केला. निवडणूकांचा सुगावा लागून देशातील अनेक प्रांतातील सरदारांना सिंहासनाची स्वप्ने पडू लागली होती. ह्या सर्व स्वप्नाळू सरदारांमध्ये पश्चिमेतून कमळेंद्र, दक्षिणेतून भव्यललीता, करूणैनक, पूर्वेतून तीरकुमार, उत्तरेतून मृदूयम आणि नव्याने उदय झालेल्या विंदकेरसुणी ह्या सर्वांचा समावेश होता. पश्चिमेतल्या वक्रमुख सरदाराने निवडणूक न लढायचे जाहिर केल्याने एक प्रतिस्पर्धी कमी झाला होता. ह्या सर्व सरदारांपैकी कमळेंद्र, मंदहूल आणि विंदकेरसुणी ह्या तीन सरदारांची दावेदारी सर्वात प्रबळ होती. कमळेंद्राने अनेक ठिकाणी फिरून आपापल्या उपसरदारांना देशातील लहान निवडणुकांमध्ये जिंकून दिले होते. परंतु राजधानीत विंदकेरसुणीने सर्वांना धक्का देऊन भक्षशीला नावाच्या सरदारणीचा पराभव केला. मालक सरदारांच्या जाचाला कंटाळून प्रांतोप्रांतीचे अनेक शिपाई विंदकेरसुणीच्या आश्रयाला आले होते. त्यांच्या कुमारलीला आणि चित्रविचीत्र वक्तव्यांनी वातावरण प्रशांत न होता प्रभूषण वाढत होते. सुरूवातीला शिपायांच्या कामगिरीमुळे खुष असलेला विंदकेरसुणी नंतर नंतर मेटाकुटीस येऊ लागला. तिकडे पश्चिमेत कमळेंद्रावर प्रजा भलतीच खुश होती. आपल्या प्रांतात तो सलग ३ वेळा निवडून आला होता आणि राजाच्या हातावर तुरी दिली होती. राजाची माणसे आणि दवंडी पिटण्याचे कंत्राट घेतलेले चमू कमळेंद्राविरूध्द रान पेटवत असत परंतु प्रांतोप्रांतीच्या चव्हाट्यांवर बसणारी तरूण पिढी ह्या सर्वांना बधत नसे. शिवाय दक्षवंशाच्या प्रजेचा पाठिंबा असल्यामुळे कमळेंद्राला आत्मविश्वासाचे भरते आले. परंतु आता विंदकेरसुणीचा बोलबाला वाढू लागला होता. कमळेंद्र विंदकेरसुणीबद्दल काहीच बोलत नसला तरी कमळेंद्राचे समर्थक विंदकेरसुणीवर हल्ला चढवीत होते. विंदकेरसुणी ’हातोबुद्धाच्या शिपायांचे भाले वापरतो’ असा त्याच्या विरोधकांचा आरोप होता. त्यात भर म्हणून त्याचे पूर्वाश्रमीचे गुरू सहस्रभोजन देखील सामिल होत. त्यांच्या नावात भोजन असले तरी त्यांची ख्याती भोजन न घेण्यासाठी त्रिखंडात होती. विंदकेरसुणी सर्वांना पुरून उरला व त्याने राजधानीच्या पंचायतीत सत्ता स्थापन केली. आता भक्षशीलेविरोधातील सर्व पुरावे तो न्यायमंडळात मांडून तिला कारावासात पाठवणार असे सर्वांना वाटू लागले. परंतु विंदकेरसुणीने पंचायतीतील विरोधकाकडे अंगुलीनिर्देश करून सर्व केर आपल्या केरसुणीने गालिच्याखाली ढकलून दिला. पंचायतीकडून त्याने आपल्यासाठी एक आलिशान महाल मंजुर करवून घेतला आणि चव्हाट्यावरील सर्व तरूणांना "मी महालाला रंग कोणता लावू?" असा प्रश्न १४० शब्दांत विचारला. त्यावर अनेकांनी आगपाखड केली तर काहीजण विंदकेरसुणीकरिता सुपली घेऊन धावले. प्रशासनाचे रथ घेणार नाही असे म्हणून पंचायत जिंकल्यानंतर लगेच सर्व शिपायांनी नवीन रथांची मागणी केली. अनेकविध प्रश्नांवर विंदकेरसुणीची मते विचारली असता तो "कमळेंद्र आणि मंदहूलाकडे जा" असे सांगू लागला. हे सर्व पाहून विंदकेरसुणीच्या विरोधात प्रजा नाराजी व्यक्त करू लागली. असे असले तरी संपूर्ण देशात उत्कंठावर्धक वातावरण होते. 

राजधानीत राहणारे एक श्वानजोडपे: श्वेतपुच्छा आणि रात्ररूदक हे सर्व पाहात असत. एकदा असेच दोन्ही श्वान रात्रीचे भोजन करीत असतांना श्वेतपुच्छेने रात्ररूदकाला प्रश्न केला, "भो रात्रीरूदक, ह्या मानवांचे काय चालले आहे? निवडणूकीपूर्वी जनतेला वचने देऊन नंतर त्याच्या विपरीत वागणार्‍यांबद्दल तुझे काय मत आहे?" ह्यावर रात्ररूदकाने केवळ एक कटाक्ष टाकला आणि समोरील भाकरीचा तुकडा घेऊन चघळू लागला. त्यावर काहीशी नाराज श्वेतपुच्छा म्हणाली, नेहमी कारण नसतांना भुंकणारा तू, आता गप्प का? भुंक की! त्यावर रात्ररूदकाने काहीश्या अनिच्छेने भाकरी टाकली आणि भूंकू लागला. "ऐक तर..महाराष्ट्र प्रांतातील कुमारांना मराठीच्या पाठ्यपुस्तकात एक धडा आहे. ’आतले आणि बाहेरचे’. त्यात लेखिका म्हणते की मुंबापुरीतील सार्वजनिक अग्निरथांत प्रवास करणार्‍यांची नेहमीच झुंबड उडालेली असते. त्यात आत बसलेले प्रवासी स्थानक आले की दरवाज्यापाशी गर्दी करतात आणि बाहेरच्यांना चढू देत नाहीत. बाहेरचेही आतल्यांशी लढा देउन आत प्रवेश करतात. मात्र पुढचे स्थानक आले की बाहेरून लढा देउन आत आलेले आतल्यांना सामील होतात आणि पुढच्या स्थानकावरून चढू पाहणार्‍या प्रवाश्यांना चढू देत नाहीत. समजले मला काय म्हणायचे आहे?" त्यावर श्वेतपुच्छेने होकारार्थी भुत्कार टाकला आणि रात्ररूदकासमोर पडलेली भाकरी घेऊन पसार झाली.
©Chirag Patki

No comments:

Post a Comment